स्थापना : १९२०
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ
नोंदणी क्र. : ई ७१६५/७९ मुंबई
Chinchpokli Cha Chintamani History

स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि जागृत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९२० साली झाली. आज या गोष्टीला १०५ वर्षे पूर्ण होत आहेत. या १०५ वर्षाच्या कालावधीत मंडळाने तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. पण मंडळ नेटाने उत्सव साजरा करीत राहिलं आणि लोक जागृतीही. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईतील दुसरे सर्वात जुने मंडळ आहे.

टिळकांना आदरांजली वाहण्यासाठी ६ सप्टेंबर १९२० रोजी लोकमान्यांचा आदर्श बाळगणारे त्यावेळचे या विभागातील कै.दत्ताराम अर्जुन पुजारी, कै.महादेव बसनाक, कै.दत्ताराम रामचंद्र मयेकर, कॅप्टन.ल. त्र्यं.पाटणकर इत्यादीं मंडळींनी मंडळ स्थापनेत पुढाकार घेतला आणि स्थापन झालं चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

केवळ चार आणे वर्गणीवर मंडळाने हा उत्सव सुरू केला. मंडळाच्या पहिल्या श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली ती 'डेक्कन कोर' च्या जागेत. त्यानंतर १९ वर्षांनी मंडळाला नवी जागा मिळाली ती चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे हद्दीच्या भिंती लगत. तेव्हापासून याच जागेत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.

पहिली पाच वर्षे कुठलाही पदाधिकारी न नेमता सर्व कार्यकर्त्यांनी संघटित नेतृत्वाच्या संकल्पनेवर मंडळाचे कामकाज चालवले. मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून १९२६ साली श्री.गणपत सीताराम कामत यांना मान मिळाला. प्रारंभीच्या काळात मंडळ कार्यकर्त्यांकडून चार आणे वर्गणी घेत असे. या चार आण्यांच्या थेंबातून आर्थिक तळे साचू लागले. त्यातूनच मंडळांने हाती घेतलेले व्रत सुरू राहिले आणि १९४५ साली मंडळाने आपला रजत जयंती उत्सव साजरा केला. १९५६ साली मंडळाची घटना तयार झाली व मंडळाचे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे व्यापक नाव देण्यात आले.